मुंबई - 'पद्मावत' सिनेमावरुन देशभरात सुरू असलेल्या वादात अभिनेत्री रेणुका शहाणेनं उडी घेतली आहे. 'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना रेणुका शहाणेनं तीव्र विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे. पद्मावत सिनेमाच्या समर्थनार्थ रेणुका शहाणेनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. पोस्ट करण्यात आलेल्या फोटोच्या माध्यमातून समाजाशी संबंधीत महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न तिच्याकडून करण्यात आला आहे. पद्मावत सिनेमावर बंदी आणण्याऐवजी महिलांवर होणा-या अत्याचारांवर बंदी आणा, असा महत्त्वपूर्ण संदेश रेणुका शहाणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
महिलांवर होणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि भ्रूण हत्या यांसारख्या अत्याचारांविरोधात लढण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न रेणुकानं केला आहे. रेणुका शहाणेच्या पहिल्या फोटोमध्ये 'पद्मावत बॅन'च्या पोस्टरवर फुल्लीची खूण केलेली पाहायला मिळत आहे. यानंतरच्या फोटोंमध्ये महिलांवरील बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि भ्रूण हत्यावर बंदी आणण्यासंदर्भातील संदेश देणारे पोस्टर रेणुका शहाणेच्या हातात दिसत आहेत. 'पद्मावत'च्या समर्थनार्थ रेणुका शहाणे केलेले हे फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
कुरुक्षेत्रमधील मॉलमध्ये गोळीबार व तोडफोड हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे पद्मावत सिनेमाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. कुरुक्षेत्रमधील केसल मॉलमध्ये अज्ञातांनी गोळीबार करत तोडफोडदेखील केली. रविवारी (21 जानेवारी) संध्याकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, एकीकडे हरियाणातील मंत्री अनिल विज पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावेळी सिनेमागृहांना पूर्ण संरक्षण पुरवण्याची तयारी दर्शवत आहेत आणि दुसरीकडे स्वाभिमानी व सच्च्या देशभक्तानं हा सिनेमा पाहू नये, असं वारंवार सांगत आहेत.
गुरुग्राममधील सिनेमागृह मालकांना धमकीदरम्यान, कोणत्याही परिस्थिती पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याच्या निर्णयावर करणी सेना ठाम आहे. अनेक राज्यांमध्ये करणी सेनेनं पद्मावत सिनेमाविरोधात तीव्र निदर्शन केली आहेत. आता गुरुग्राममधील सिनेमागृहांच्या मालकांनी पद्मावत प्रदर्शित करू नये,यासाठी पत्रांचं वाटप करत त्यांना धमकावण्यात आले आहे.