देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप हळूहळू कमी होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या आसपास घुटमळत आहे. यामुळे परिस्थिती चांगली होत असल्याचे दिसू लागल्याने काही राज्यांनी शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, त्रिपुरा, उत्तराखंड, बिहारसारख्या राज्यांमध्ये १०वी, १२वीसाठी शाळा सुरु झाल्या आहेत किंवा या महिन्यात सुरु होणार आहेत. यामुळे अन्य राज्यांवरही शाळा सुरु करण्यासाठी दबाव वाढू लागला आहे.
स्थानिक स्तरावर कोरोना प्रकोप नसलेल्या शहरांमध्ये शाळा सुरु होत आहेत. पटना, कोलकातासह अनेक शहरांमध्ये सध्या ही व्यवस्था आहे. आता शिक्षक आणि पालकांकडून सरकारवर दबाव वाढू लागला आहे. बेंगळुरुमध्ये तर शनिवारी शाळा उघडण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
उत्तराखंड सरकारने १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये सोमवारपासून १०वी, १२वी च्या शाळा सुरु केल्या जाणार आहेत. तर ९वी आणि ११वीच्या शाळा २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्रात ९वी ते १२वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, ५वी ते ८वीचे वर्ग बंद आहेत. ओडिशामध्येही शाळा खोलण्यावरून संभ्रम आहे. तेथे यंदा शाळा उघडण्याची शक्यता खूप कमी आहे. बिहारमध्ये लवकरच ८वी पर्यंतच्या शाळा उघडण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांनी तर यंदा शाळा उघडणार नाहीत अशी घोषणाच केली आहे. यामध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मिझोरामसारखे राज्य सहभागी आहेत. मध्य प्रदेशमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा ३१ मार्च, २०२१ पर्यंत बंद राहणार आहेत.
बंगळूरुमध्ये आज एक शांततेत आंदोलन बोलविण्यात आले आहे. शाळा तातडीने सुरु कराव्यात अशी आंदोलकांची मागणी आहे. मार्चपासून शाळा बंद असल्याने मुलांच्या पोषण आणि आरोग्याला मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अल्पवयीनांच्या लग्नामध्येही मोठी वाढ झाली असल्याचा आरोप व्ही. पी. निरंजन आचार्य यांनी केला आहे. अनेक राज्यांची सरकारे कोरोना लसीची वाट पाहत आहेत. तसेच कोरोनापासून परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत.