नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कारस्थान रचत आहे. मात्र, त्यांच्या या नापाक हरकतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान तयार आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.
'इंडियाज मोस्ट फिअरलेस' या शूरवीर जवानांवरील पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राजधानी दिल्लीत करण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित होते. ते म्हणाले, सीमेपलीकडे जे दहशतवादी आहेत. ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयार आहेत. परंतु आम्हीदेखील त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी तयार आहोत. ज्यावेळी ते भारताच्या सीमेवर पाऊल ठेवतील, त्यावेळी आम्हीही त्यांना जमिनीच्या खाली अडीच फूट खोल गाडू, अशा कडक शब्दांत बिपिन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. याचबरोबर, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून जो काही संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिलाय. मात्र, त्यांना तो समजला नाही, तर गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू, असे बिपिन रावत म्हणाले.