श्रीनगर : जम्मू- काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने एका कारमधील ४५ किलो आयईडी स्फोटके निष्क्रिय केली. हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश- ए- मोहम्मद या अतिरेकी संघटनांनी फेब्रुवारी २0१९ सारखाच सुरक्षा दलाची वाहने लक्ष्य करण्याचा कट आखला होता. मात्र, सुरक्षा दलाच्या सतर्कतेने हा कट उधळून लावण्यात आला.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, या दोन अतिरेकी संघटनांनी सुरक्षा दलाला पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचे ठरविले होते. गतवर्षी झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यांनी सांगितले की, हिज्बुल आणि जैश या संघटना सुरक्षा दलावर हल्ला करणार असल्याची माहिती पोलिसांना एक आठवड्यापूर्वीच मिळाली होती.
कुमार यांनी सांगितले की, याबाबत अशी माहिती मिळाली आहे की, हिज्बुलचा अतिरेकी आदिल जो जैशसोबतही काम करतो आणि फौजी भाई (हा पाकिस्तानी अतिरेकी असून, पुलवामात जैशचा कमांडर आहे.) हे या षड्यंत्रात सहभागी आहेत. गतवर्षी अवंतीपोरामध्ये झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला करण्याचा या अतिरेक्यांचा विचार होता.
1. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, या अतिरेक्यांची माहिती बुधवारी मिळताच सुरक्षा दलांनी पुलवामात नाकेबंदी केली. सायंकाळी एक कार तपासणी चौकीवर आली तेव्हा संशय आल्याने सुरक्षा दलाने इशारा म्हणून गोळ्या चालविल्या. त्यानंतर अतिरेकी कार वळवून फरार झाले.
2. अन्य चौक्यांवरही सुरक्षा दलाने गोळीबार केल्यानंतर अतिरेकी ही कार सोडून अंधाराचा फायदा उठवून पळाले. सुरक्षा दलाने वाहनाची झडती घेतली तेव्हा यात स्फोटके आढळून आली. सकाळी बॉम्बनाशक पथक दाखल झाले. पोलीस, सैन्य आणि निमलष्करी दल यांनी आयईडी निष्क्रिय केले.