नवी दिल्ली : मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही, कुठेही फेरमतदान होणार नाही, अशी भूमिका सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी घेणाऱ्या निवडणूक आयोगाने नंतर मात्र, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. हे मतदान बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत होईल.गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेवून त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार, राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगाने स्पष्ट केलेले नाही.गोंदिया-भंडारा, पालघर, कैराना या लोकसभा, तसेच नागालँडमधील एका विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांत बिघाड होत असल्याच्या, ती नीट चालत नसल्याच्या, तसेच त्याची बटने नीट नसल्याच्या असंख्य तक्रारी विरोधी पक्षांनी काल केल्या होत्या, पण मतदान यंत्रांत नव्हे, तर व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत म्हणाले होते. असे असताना त्यांनीच नंतर कैरानामधील ७३, गोंदिया-भंडारामधील ४९, तसेच नागालँडमधील एका बुथवर फेरमतदान होईल, असे आदेश दिले. पालघरमधूनही अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र, तेथे कोणत्याही बुथवर फेरमतदान होणार नाही. बुधवारी मतदान संपल्यानंतर गुरुवारी १४ मतदार संघांत मतमोजणी होणार आहेत. त्यात लोकसभेचे ४ व विधानसभेचे १0 मतदार संघ आहेत.
१२३ बुथवर आज होणार फेरमतदान, गोंदियाचे जिल्हाधिकारी काळे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:10 AM