नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यास अशा न्यायाधीशांची अन्यत्र बदली करणे हा न्यायसंस्था उत्तरदायी बनविण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, ‘चुकार’ न्यायाधीशांच्या संदर्भात राज्यघटनेत महाभियोग आणि बदली असे दोन मार्ग आहेत. यापैकी महाभियोगाचा मार्ग अपवादाने स्वीकारला जातो व अद्यापपर्यंत एकदाही यशस्वी झालेला नाही. त्या तुलनेत बदली करण्याचा मार्ग जास्त वेळा अनुसरला जात असला तरी इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोही प्रभावी उपाय नाही.प्रा. टॉम गिन्सबर्ग आणि अझीझ झेड. हक यांनी लिहिलेल्या ‘हाऊ टू सेव्ह ए कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी रात्री ते बोलत होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मेघालयला बदली होणे व ती न स्वीकराता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा देणे यावरून टीका होत असताना ‘कॉलेजियम’चे सदस्य असलेल्या न्या. चंद्रचूड यांनी हे भाष्य केले आहे.स्वायत्तता आवश्यकचन्यायसंस्थेचे उत्तरदायित्व व स्वायत्तता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेमध्ये ही यंत्रणा अजिबात उत्तरदायी नसणे बिलकुल अभिप्रेत नाही. न्यायसंस्थेला निखालस खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यासाठी स्वायत्तता गरजेची आहे.हल्ली प्रत्येक महत्त्वाच्या निकालानंतर खास करून समाजमाध्यमांतून न्यायाधीशांवर व्यक्तिगत टीका होत असते; पण न्यायाधीश याला उत्तर देऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठ वकील अरविंद पी. दातार यांचेही यावेळी भाषण झाले. लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायसंस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
'‘चुकार’ न्यायाधीशांच्या बदल्या करणे हा प्रभावी उपाय नाहीच'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:40 AM