नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राफेल लढावू विमान खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने या मुद्दावर रान उठवले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक सभेत नरेंद्र मोदी सरकारवर राफेलवरून टीका केली. त्यामुळे राफेल विमान सर्वांनाच परिचीत झाले. यातच आता दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयासमोर राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे.
दिल्लीतील २४ अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. त्याला लागूनच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना बाहेरच राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. त्याला लागूनच काँग्रेस मुख्यलय असल्यामुळे ही प्रतिकृती काँग्रेस मुख्यालयासमोर लावली असा भास होतो. राफेलची येथील प्रतिकृती दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. एएनआयने देखील याचा फोटो शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच धनोआ यांनी राफेल विमानांचे कौतुक केले होते. तसेच राफेलची उत्सकता लागल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यात आता राफेल विमानाची प्रतिकृतीच धनोआ यांच्या घरासमोर लावण्यात आली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये राफेल विमान भारतात दाखल होणार आहे.