New Delhi Railway Station stampede Report: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (१४ फेब्रुवारी) चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची आरपीएफने चौकशी करून एक रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, प्लॅटफार्म क्रमांक १२,१३,१४,१५ आणि १६ कडे जाणारा रस्ता गर्दीमुळे पूर्णपणे बंद झाला होता. रेल्वे स्थानकावर गर्दी वाढत असल्याने आरपीएफ निरीक्षकांनी रेल्वे स्थानका व्यवस्थापकांना विशेष रेल्वे लवकर सोडण्याचा सल्ला दिला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, ही चेंगराचेंगरी रात्री ८.४८ वाजता झाली. शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री ८ वाजता शिवगंगा एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म १२ वरून निघाली. त्यानंतर प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर गर्दी होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे १२, १३, १४, १५ आणि १६ या प्लॅटफॉर्मकडे जाणारे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे रेल्वे पोलीस निरीक्षकाने रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना विशेष रेल्वे लवकर सोडण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर प्रत्येक तासाला १५०० तिकीट दिले जात होते. तिकीट विक्री थांबवण्यास सांगितले होते.
धावपळ सुरू झाल्याची देण्यात आली होती सूचना
रिपोर्टनुसार, ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ८.४५ वाजता गर्दी कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी उद्घोषणा करण्यात आली की, कुंभ मेळ्यासाठी जाणारी विशेष रेल्वे गाडी १२ वरून जाणार. त्यानंतर काही वेळातच पुन्हा घोषणा करण्यात आली की, कुंभ मेळ्यासाठी जाणारी ही विशेष रेल्वे प्लॅटफॉर्म १६ वरून जाईल. त्यामुळे धावपळ सुरू झाली. धावपळ सुरू झाल्याची माहिती ८.४८ वाजता रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्याला देण्यात आली होती.
घोषणेमुळे प्रवासी पळायला लागले
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, घोषणा ऐकल्यानंतर प्रवासी प्लॅटफॉर्म १२-१३ आणि १४-१५ वरून प्रयागराज विशेष गाडी पकडण्यासाठी धावू लागले. प्रवासी फूट ब्रिजवर २ आणि ३ वर चढू लागले होते. त्याचवेळी दुसरी रेल्वे गाडी पकडण्यासाठी लोक खाली येत होते. याचदरम्यान धक्काबुक्की झाली आणि गोंधळ उडाला. काही लोक घसरून पडले आणि चेंगराचेंगरी झाली.