संजय शर्मानवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील नैतिकता समितीचा अहवाल उद्या संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय दंड संहितेची तीन विधेयकेही उद्या लोकसभेत पारित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महुआ मोइत्रांवरील विनोद सिनकर यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालाबाबत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. महुआ मोइत्रांवर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. समितीने अहवाल अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे सुपूर्द केला होता. यात महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे.
भाजप खासदारांना व्हिप महुआ मोइत्रांवरील नैतिकता समितीच्या अहवालावर जोरदार गदारोळ होण्याची शक्यता पाहून भाजपने उद्या लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय न्याय व्यवस्था बदलण्यासाठी इंडियन पिनल कोडच्या जागी भारतीय न्याय संहिता विधेयक, क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक व इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष विधेयक सादर केले होते.