प्रदेशाध्यक्षांकडून मागविला अहवाल; काँग्रेस जाणून घेणार पराभवाची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 04:00 AM2019-06-08T04:00:08+5:302019-06-08T04:00:20+5:30
प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचा अभ्यास पक्षाने सुरू केला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाने सगळ्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.
‘लोकमत’ कडे हे पत्र असून त्यात म्हटले आहे की, प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे. सूत्रांचा दावा आहे की पक्षाचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे पक्षाचे किती नुकसान झाले आणि कलह दूर करण्यासाठी काय उपाय करावेत हे पडताळून बघत आहे. परंतु, ही सर्व उपाययोजना सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णविराम मिळाल्यानंतरच पूर्ण होईल.
११ जूननंतर कार्यकारिणी समितीची बैठक
राज्यांच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या या पत्रात ११ जूनपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ११ जूननंतर पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तीत प्रत्येक राज्याच्या प्रभारी महासचिवाकडून प्रदेश अध्यक्षांकडून मिळालेल्या अहवालावर टिप्पणी मागितली जाईल. त्यातून हे समजून घेता येईल की, पक्षाचा लोकसभा निवडणुकीत एवढा दारूण पराभव का झाला.