ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली असली तरी शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावले आहे. उद्धव व राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त निराधार असून शिवसेनेविषयी गैरसमज पसरवून राजकीय गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी कल्याण - डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेना व मनसे एकत्र लढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत होता. मात्र रविवारी शिवसेनेने पत्रक काढून हे वृत्त फेटाळून लावले आहे. 'शिवसेना हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे, गुप्त खलबते करण्यावर आमचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरेंमध्ये कोणतीही भेट झालेली नाही' असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. हल्ली काही जण अफवानाच बातम्यांचा देऊन पत्रकारितेचा दर्जा खालावत आहे असे सांगत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवरच टीकास्त्र सोडले. आगामी महापालिका निवडणुकीत भगवाच फडकेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.