ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २५ - पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने पुन्हा एकदा सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनच्यावेळी काश्मिरचा उल्लेख केला. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी कोलकात्यातील जनतेचे आभार मानतो तसेच पाकिस्तान आणि काश्मिरमधून जनतेने इथे येऊन आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असे आफ्रिदी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी बोलताना म्हणाला.
बीसीसीआयने भारतात आमची चांगली काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे असे आफ्रिदीने सांगितले. मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी नाणेफेकीच्यावेळी आफ्रिदीने आम्हाला पाठिंबा देण्यासाठी काश्मिरमधून लोक इथे आले आहेत असे वादग्रस्त विधान केले होते. त्याच्या या विधानावर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टिकाही केली होती.
ऑस्ट्रेलियाकडून २१ धावांनी पराभव झाल्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मायदेशात परतल्यानंतर आफ्रिदीची कर्णधारपदावरुन गच्छंती अटळ आहे. मायदेशात परतल्यानंतर रोषाची धार कमी व्हावी यासाठी आफ्रिदी वारंवार काश्मिरचा उल्लेख करतोय असे क्रिकेटच्या जाणकरांनी सांगितले.
निवृत्तीविषयी बोलताना त्याने सांगितले कि, मायदेशात गेल्यानंतर मी याबद्दल निर्णय घेईन. जे देशासाठी चांगले असेल तो निर्णय मी घेईन. मिडीयाचा माझ्यावर दबाव आहे. माझे कुटुंबिय आणि वसिम अक्रम यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी निर्णय घेईन असे आफ्रिदीने सांगितले. मी खेळाडू म्हणून फिट आहे पण कर्णधार म्हणून नाही असे त्याने सांगितले.