Vice President Jagdeep Dhankhar on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरएसएस आणि भाजपवर हल्ला चढवला. भारत ही एक कल्पना आहे, असे आरएसएसचे मत आहे. मात्र भारत हा अनेक विचारांनी बनलेला आहे असे आपण मानतो. पंतप्रधान संविधानावर आघात करत असल्याचे भारतातील कोट्यवधी जनतेला निवडणुकीतून स्पष्टपणे कळले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राहुल गांधी यांना सुनावलं आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा देशाच्या शत्रूंमध्ये समावेश होणे निंदनीय, घृणास्पद आणि असह्य असल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्याबद्दल भाजपसह मित्र पक्षांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधीचा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं होतं. यावरुन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना राष्ट्रहिताची माहिती नाही. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने देशाच्या शत्रूंशी हातमिळवणी करणे हे निंदनीय, घृणास्पद आणि असह्य आहे, अशी टीका उपराष्ट्रपती धनखड यांनी केली.
संसद भवन संकुलातील राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती नेमके उलटे करत आहे हे किती खेदजनक आहे. तुम्ही देशाच्या शत्रूंसोबत सामील व्हाल यापेक्षा निंदनीय, घृणास्पद आणि असह्य दुसरे काहीही असू शकत नाही. अशा लोकांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. या देशाची सभ्यता ५००० वर्षे जुनी आहे हे त्यांना समजत नाही. मला दु:ख आणि वेदना होत आहेत की काही महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांना राष्ट्रहिताचे ज्ञान नाही, असं राष्ट्रपती धनखड म्हणाले.
"महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना भारताबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे मी दु:खी आणि अस्वस्थ आहे. त्यांना ना आमच्या राज्यघटनेची माहिती आहे ना त्यांना राष्ट्रहिताची. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि या देशाचे रक्षण करण्यासाठी लोकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आमचे बंधू-भगिनी देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आहेत. मातांनी आपले मुलगे गमावले, पत्नींनी त्यांचे पती गमावले. आपण आपल्या राष्ट्रवादाची चेष्टा करू शकत नाही. प्रत्येक भारतीयाला देशाबाहेर राष्ट्राचे राजदूत व्हावे लागेल," असेही राष्ट्रपती धनखड यांनी म्हटलं आहे.