नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमधील देलुगू देसम पक्षाचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी पक्षाने जारी केलेल्या व्हीपला विरोध केला आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याकडून दाखल करण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावामध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याचे राजकीय वातावरण अतिशय गढूळ बनले आहे. त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडू इच्छित आहे. याबाबत मी पक्षप्रमुख चंद्राबाबू नायडू यांनाही यापूर्वीच सांगितल्याचे रेड्डी यांनी म्हटले.
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर, टीडीपी खासदार दिवाकर रेड्डी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंध प्रदेशला विषेश दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाला जवळपास 50 पेक्षा अधिक सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले. तसेच लोकसभा सभागृहात या अविश्वास प्रस्ताववर 20 जुलै रोजी दिवसभर चर्चा होण्याची शक्यता असून त्याचदिवशी मतदानही घेतले जाऊ शकते. दरम्यान, भाजपने पुरेसे म्हणजेच 273 संख्याबळ असल्याने विश्वासमत सिद्ध करु असे म्हटले. तर मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा ठराव संमत करु एवढे संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावा काँग्रेसप्रमुख सोनिया गांधी यांनी केला आहे.