नवी दिल्ली - देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिश शाह आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहीत अनेक दिग्गज उपस्थित होते. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शौर्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. यापूर्वी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर होणार आहेत.