नवी दिल्ली - 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निमंत्रण दिले आहे. मात्र, चौथ्या रांगेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती एका काँग्रेस नेत्यानं दिली आहे. दरम्यान, नेतेमंडळी आणि मंत्र्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे, आसन व्यवस्थेत कोणत्याही प्रकारे प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आलेले नाही, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. प्रोटोकॉलनुसार राजकीय नेत्यांचा क्रमांक प्राधान्यानुसार उतरत्या क्रमानं येतो. विरोधी पक्षातील कित्येक दिग्गज नेतेदेखील मागील रांगेतच बसतात. सध्या विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी असल्यानं लोकसभेत विरोधी पक्षनेता नाहीय.
नाव उघड न करण्याच्या अटीवर काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चौथ्या रांगेत आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मोदी सरकार अतिशय घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यानं केला आहे. दरम्यान, कुठेही आसन व्यवस्था केली असली तरीही राहुल गांधी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणार असल्याचंही यावेळी काँग्रेस नेत्यानं सांगितले.
आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, अशा कार्यक्रमात काँग्रेस नेतृत्वाचा केंद्र सरकारला अपमान करायचा आहे, असा थेट आरोपच एका काँग्रेस नेत्यानं केला आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीच्या अध्यक्षांना स्वातंत्र्यापासूनच पहिल्या रांगेत बैठकीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. सोनिया गांधीदेखील काँग्रेस अध्यक्ष असताना नेहमीच पहिल्या रांगेत त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. 2014 मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्या रांगेत स्थान देण्यात येत आहे.