आज भारतात ७१वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता? हे जाणून घेऊया....
देशाला पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये तयार करण्यात आला होता. कोलाकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता.
नंतर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ.एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.
भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास १९२१ मध्ये तेव्हा सुरु झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. त्यानंतर ध्वजामध्ये काही बदल करण्यात आले. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. २२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला.
ध्वजातील रंगांचा अर्थ
भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे. तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे. त्याचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.
राष्ट्रध्वजासंबंधी नियम
भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.
– भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे.
– राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे
– ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा
– शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा
– केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो
– राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.