नवी दिल्ली - आज भारताचाप्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त दिल्लीतील राजपथावर संचलन झाले. विविध राज्यांमधील चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाची शोभा वाढवली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा हाच जोश पंजाबमधील अटारी-वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सोहळ्यामध्ये दिसला. यावेळी भारतीत जवानांच्या जोशपूर्ण कवायतींमुळे शेजारील पाकिस्तानच्या सैनिकांचे डोळे दिपले. यावेळी अटारी बॉर्डरवर उपस्थित असलेले लोकांनी देशभक्तीपर घोषणा देत भारतीय जवानांचा उत्साह वाढवला.
प्रजासत्ताक दिनाच्या खास औचित्याने पंजाबमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटारी-वाघा गेटवर विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेले नागरिक देशभक्तिपर गीतांवर सुरात सूर मिळवत होते. तसेच देशभक्तिपर घोषणा देत होते.
तत्पूर्वी दिल्लीतील राजपथावर झालेल्या परेडमध्ये भारताचे शौर्य आणि संस्कृतीचे दर्शन झाले. परेडमध्ये टँक सेंच्युरियन, टँक पीटी ७६, अर्जुन टँक, आयसीव्ही बीएमपी-२ ऑन टँक ट्रान्सपोर्टेशन, ७५ पॅक हॉवित्झर मार्क १, धनुष गन सिस्टिम, टायगर कॅट सीडब्ल्यूएस मिसाईल आणि आकाश मिसाईलच्या तुकड्यांनी भाग घेतला होता. परेडमध्ये सर्वात पुढे पहिली तुकडी ६१ केवेलरीची होती. ही जगातील एकमेव कार्यरत सक्रिय हॉर्स केवेलरी रेजिमेंट आहे.
राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय नौदलाच्या चित्ररथानेही भाग घेतला होता. तसेच हवाई दलाच्या भविष्यासाठी भारतीय नौदलातील परिवर्तन हा विषय मांडला गेला. त्यामध्ये मिग २१ Gnat, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, अश्लेषा रडार आणि राफेल विमानाचे स्केल डाऊन, मॉडेल प्रदर्शित केले गेले.