नवी दिल्ली – भारतात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. घरापासून चौकापर्यंत भारताचा तिरंगा झेंडा फडकताना दिसत आहे. प्रत्येक देशवासिय तिरंग्यावर जेवढं प्रेम करतो तितकचं त्याची प्रतिमा राखण्यासाठी प्रयत्न करत असतो. तिरंग्याची आन-बान-शान राखण्यासाठी आतापर्यंत सीमेवर हजारो सैनिकांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे. परंतु या तिरंग्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का?
सध्या अस्तित्वात असलेला तिरंगा झेंडा २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. तेव्हापासून तिरंग्याचं स्वरुप हेच आहे. तिरंगा झेंडा नावानुसार तीन वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. ज्यात सर्वात वर केशरी रंग दिसतो तो देशाच्या ताकदीचा आणि ध्यैर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर मध्ये सफेद पट्टीसोबत धम्मचक्र दिसतं ते शांती आणि सत्याचं प्रतीक मानलं जातं. तर खाली हिरव्या रंगाचा पट्टा दिसतो तो देशाची समृद्धी, विकास आणि हरितक्रांतीचे प्रतीक मानलं जातं. झेंड्याची रुंदी आणि लांबी अंदाजे २ बाय ३ अशी असते.
स्वातंत्र्यापूर्वी ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक कोलकाता येथे पहिल्यांदा ध्वज फडकला होता. त्यावेळी क्रांतीकाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाचं नाव दिलं होतं. या ध्वजात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची पट्टी होती. हिरव्या रंगाच्या पट्टीत कमळाचं फूल होतं. तर पिवळ्या रंगात वंदे मातरम् आणि लाल रंगात चंद्र-सूर्याची प्रतिमा होती. तर देशाचा दुसरा झेंडा पॅरिसमध्ये फडकला होता. परंतु याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
काहींच्या मते, क्रांतीकारी मॅडम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये हा झेंडा फडकावला होता. तर काहींच्या मते ही घटना १९०५ मध्ये झाली होती. या ध्वजातील रंग पहिल्या झेंड्याप्रमाणे होते. परंतु त्यातील डिझाईनमध्ये थोडा बदल होता. यातील वरच्या पट्टीत केवळ एक कमळ आणि सात तारे होते जे सप्तऋषी म्हणून ओळखले जातात. हा झेंडा बर्लिनमध्ये झालेल्या समाजवादी संमेलनात अनावरण करण्यात आले होते.
देशाचा तिसरा ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी १९१७ मध्ये होमरूल आंदोलनादरम्यान फडकवला होता. या ध्वजावर ५ लाल आणि ४ हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या. यात सप्तर्षीच्या अभिमुखतेमध्ये सात तारे, डाव्या आणि वरच्या बाजूस युनियन जॅक, एका कोपऱ्यात पांढरा चंद्रकोर आणि तारा होता.
आंध्र प्रदेशच्या एका युवकाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात चौथा ध्वज फडकवला होता. तो महात्मा गांधींना सोपवला होता. हा कार्यक्रम १९२१ रोजी विजयवाडा येथे झाला होता. हा झेंडा लाल, हिरव्या रंगाने बनवला होता. ज्यात देशातील दोन प्रमुख समुह हिंदू आणि मुस्लीम यांना प्रतिनिधित्व दिलं होतं. झेंडा दाखवल्यानंतर गांधींच्या सूचनेनंतर त्यात इतर समुदायाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी सफेद रंगाची पट्टी आणि एक चरखा जोडण्यात आला. त्यानंतर पाचवा झेंडा पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरण्यासाठी प्रस्ताव आला. हा झेंडाही आत्ताच्या झेंड्यापेक्षा थोडा वेगळा होता. त्यात अशोक चक्राऐवजी चरखा होता आणि इतर रंग समान होते. हा ध्वज १९३१ मध्ये आणला होता.
तर सहावा तिरंगा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. यात केवळ एकमेव बदल करण्यात आला तो म्हणजे चरख्याऐवजी धम्मचक्र ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हाच भारताचा तिरंगा झेंडा सर्व देशातील नागरिकांसाठी अभिमान ठरला आहे. तिरंगा झेंड्याची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यासाठी अनेकजण निष्ठेने आदरपूर्वक काम करत असतात.