नवी दिल्ली-
दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात बदल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यंदा २६ जानेवारी रोजी होणारं संचलन निर्धारित वेळेच्या अर्धातास उशीरानं होणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचं संचलन सकाळी १० वाजता सुरू होतं. पण यावेळी सकाळी १०.३० वाजता संचलन सुरू होणार आहे. वेळेत बदल करण्यामागचं कारण देखील समोर आलं आहे.
दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे सकाळी धुकं तसंच प्रदुषणामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. अशात संचलन नीट दिसू शकणार नाही. म्हणून संचलनाची वेळ अर्ध्यातास उशीरानं करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या संचलनात ऑटो रिक्षाचालक, मजूर आणि फ्रंट लाइन वर्कर्ससाठी आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहेत. याआधी या क्षेत्रातील लोकांना राजपथावरुन परेड पाहता येत नव्हती. पण यंदा त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली जाणार आहे.
राजपथावर दोन्ही बाजूला यंदा १० भव्य एलईडी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत. जेणेकरुन दूरवर बसलेल्या सर्व प्रेक्षकांना स्क्रीनच्या माध्यमातून संचलन पाहता येईल.
१ हजाराहून अधिक ड्रोन करणार स्पेशल शोसंचलनाच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे. तसंच प्रत्येक प्रवेशद्वारावर वैद्यकीय तपासणी पथक असणार आहे. बीटिंग रिट्रीटमध्ये यंदा १ हजाराहून अधिक ड्रोन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या थीमवर जबरदस्त शो करणार आहेत. हजारो ड्रोनच्या माध्यमातून शो करणारा भारत जगातील चौथा देश बनणार आहे. याआधी चीन, रशिया आणि अमेरिका यांच्याकडे असं तंत्रज्ञान होतं. आता भारताचंही नाव यात सामील होणार आहे. हे तंत्रज्ञान आयआयटी दिल्लीकडून तयार करण्यात आलं आहे. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकवर प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे.