नवी दिल्ली : देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दिल्लीत कर्तव्य पथावर परेड काढली जात आहे. या परेडच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताची ताकद आणि सांस्कृतिक झलक दिसत आहे. मात्र, यंदाची परेडची सर्वात खास आहे. कारण, यंदा १६ जानेवारीची परेड भारतीय वाद्य वाजवून सुरू झाली.
याशिवाय, दुसरी विशेष बाब म्हणजे यावेळी महिला कलाकारांच्या पथकाने परेडला सुरुवात केली. यंदा परेडची सुरुवात शंख, नादस्वरम आणि नगारा या भारतीय वाद्यांच्या आवाजाने झाली. १०० महिला कलाकारांच्या तुकडीने २६ जानेवारीला पहिल्यांदाच परेड सुरू केली. या महिला कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगाडा, ढोल-ताशा इत्यादी पारंपारिक वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली. या वादक पथकामध्ये विविध राज्यांतील महिलांचा समावेश दिसून आला. एएनआयने या संदर्भात ट्विट केले असून याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झेंडा फडकवल्यानतंर देशभरातील सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. यंदा कर्तव्यपथावर दैदिप्यमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांच्यासह दिगग्जांची उपस्थिती आहे. यंदा प्रजासत्ताक दिनाची थीम 'इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी' आहे. याचा अर्थ 'भारत लोकशाहीची जननी आहे'. याच कारणामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ८० टक्के महिला आहेत. संपूर्ण परेडमध्ये कर्तव्याच्या मार्गावर महिला शक्तीचे वर्चस्व असणार आहे.