Republic Day 2024: भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन गुरुवारी भारतात दाखल झाले. सुरुवातीला ते राजस्थानच्या जयपूरमध्ये पोहोचले, तिथे राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जयपूरमध्ये भव्य रोड शो केला. जंतर-मंतरपासून सुरू झालेला रोड शो सांगणेरी गेटपर्यंत सुरू होता. यावेळी रोड शो पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
रोड शोदरम्यान, पीएम मोदी आणि मॅक्रॉन मोकळ्या कारमधून हवा महलसमोर उतरले. सुमारे 1,000 खिडक्या असलेल्या चमकदार पाच मजली इमारतीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी परिसरातील एका हस्तकला दुकानाला भेट दिली. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी श्रीराम मंदिराचे मिनी मॉडेल खरेदी केले आणि ते मॅक्रॉन यांना भेट स्वरुपात दिले.
राम मंदिराचे मॉडेल मिळाल्यावर मॅक्रॉन म्हणाले- 'आता अयोध्येला जावे लागेल'. यावेळी दोन्ही नेत्यांनी तिथेच साहू चहा स्टॉलवर बसून खास राजस्थानी चहाचा आस्वाद घेतला. चहा पिल्यानंतर दोन्ही नेते पुन्हा मोकळ्या वाहनात बसून रोड शो सांगणेरी गेटपर्यंत सुरू ठेवला. रोड शो संपल्यानंतर रात्रीचे जेवण व द्विपक्षीय चर्चेसाठी दोन्ही नेते रामबाग पॅलेसकडे रवाना झाले.
सोहळ्यात सहभागी होणारे सहावे फ्रेंच नेतेइमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे असणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फ्रेंच लष्कराची तुकडी सहभागी होत आहे. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी-रोल टँकर विमानही या समारंभात पाहायला मिळणार आहे. मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणारे सहावे फ्रेंच नेते (पाचवे राष्ट्रपती) आहेत.