Republic Day 2025 :नवी दिल्ली : भारत आज आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सगळ्यांची नजर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावर आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन केले जाईल. त्यामुळे संपूर्ण जग भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधता, एकता, समानता आणि विकासाचा एक अद्भुत संगम पाहणार आहे.
प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १०:३० वाजता सुरू होणार असून हा सोहळा जवळपास ९० मिनिटे चालणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीदांना श्रद्धांजली वाहतील, त्यानंतर ते कर्तव्य मार्गावर परेड पाहण्यासाठी पोहोचतील. यानंतर, परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि राष्ट्रगीत होईल, त्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
यादरम्यान, ३०० सांस्कृतिक कलाकार 'सारे जहाँ से अच्छा' या गाण्यावर विविध भारतीय वाद्यांवर संगीत सादर करतील आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. यानंतर, 'सुवर्ण भारत: वारसा आणि विकास' या थीमसह सजवलेल्या ३१ चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची सुरुवात होईल. यंदाच्या या सोहळ्यात जवळास ५००० कलाकार भारतातील विविध नृत्यशैली सादर करतील.
याचबरोबर, 'द डेअरडेव्हिल्स' ट्रॅकवर मोटारसायकलींवर शानदार स्टंट करताना दिसतील. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे आकाशात एक नेत्रदीपक हवाई प्रदर्शन सादर केले जाईल. या प्रात्यक्षिकात हवाई दलाची सुमारे ४० विमाने सहभागी होतील. तसेच, पहिल्यांदाच भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाचा संयुक्त चित्ररथ प्रदर्शित केला जाणार आहे. या लष्करी चित्ररथातून तिन्ही दलांमधील एकता आणि समन्वयाचे दर्शन घडेल.
'या' सोहळ्यासाठी १० हजार खास पाहुण्यांना आमंत्रणयावर्षीच्या सोहळ्यात जवळपास १०,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये हवामान कार्यकर्ते, शहीद सैनिकांचे कुटुंब आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी यांचा समावेश आहे. या पाहुण्यांमध्ये 'गोल्डन इंडिया'च्या निर्मितीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विशेष पाहुण्यांचा देखिल समावेश आहे.