- सुरेश भुसारीनवी दिल्ली : जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर अद्यापही देशाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांची (सीडीएस) नियुक्ती न झाल्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी हाेणारा गणराज्य दिन समारंभ देशाच्या सीडीएसशिवाय पार पडण्याची शक्यता आहे.दि. ८ डिसेंबर, २०२१ रोजी जनरल बिपीन रावत यांचे हेलिकाॅप्टरच्या अपघातात निधन झाले. यात त्यांच्या पत्नीसह १२ सैन्याधिकारी मृत्युमुखी पडले. यानंतर एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लाेटल्यानंतरही नव्या संरक्षण दल प्रमुखांची नियुक्ती झालेली नाही. गेल्या १७ डिसेंबर रोजी संरक्षण इस्टेट संचालनालयाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले हाेते; परंतु, या त्यांच्या विधानानंतरही एक महिना लाेटला आहे. तिन्ही दलांमध्ये सर्वांत ज्येष्ठ असलेल्या प्रमुखाकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (सीओएससी) प्रमुखपद दिले जाते. यानुसार लष्करप्रमुख मनाेज नरवणे यांच्याकडे या पदाचा कार्यभार आलेला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी मनाेज नरवणे सेवानिवृत्त हाेत आहेत. देशाच्या तिन्ही दलांच्या प्रमुखाची निवड करण्यासाठी काही नावांची शिफारस संरक्षणमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अपाॅइंटमेंट समितीकडे करतात. या समितीचे प्रमुख पंतप्रधान असतात. ही समिती देशाच्या संरक्षण दलाचा प्रमुख ठरविते.
‘सीडीएस’शिवाय हाेणार प्रजासत्ताक दिन समारंभ?; रावत यांच्या निधनानंतर पद अद्यापही रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:48 AM