नवी दिल्ली : शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देश कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलन, कोरोना संकट, भारत-चीन सीमावाद यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.
कोरोना संकटाशी लढताना आपले प्राण गमावलेल्यांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. कोरोना संकटाची तीव्रता माहिती असूनही देशसेवेसाठी लढणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या कार्याचा उल्लेख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात केला.
कोरोना संकटात अनेकांनी आपले प्राण गमावले. कोरोना संकटाशी लढताना मानवतेचे आदर्श उदाहरण अनेकांनी समोर ठेवली. भारतीय तत्त्वज्ञानातील बंधुत्वाच्या व्यापक विचारामुळे कोरोना संकटाशी लढा देणे शक्य झाले, असेही राष्ट्रपती यांनी नमूद केले.
शास्त्रज्ञांचे कौतुक आणि अभिनंदन
कोरोना काळात शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र काम करून कोरोना लस देशवासीयांसाठी उपलब्ध करून दिली. देशभरातील शास्त्रज्ञांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे. संपूर्ण देशवासीयांच्या वतीने सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. अत्यंत कमी कालावधीत कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी लस निर्मिती करून मानवतेचे कल्याण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करून इतिहास घडवला आहे. सर्व शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान आहे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
भारतीय सैन्याचा देशाला गर्व
भारतीय सैनिकांचे देशप्रेम, बलिदान आणि पराक्रम यावर देशाला गर्व आहे. सियाचीन आणि गलवान खोऱ्यात उणे ५० ते ६० अंश तापमानातही भारतीय जवानांनी सीमांचे संरक्षण केले. एवढेच नव्हे, तर राजस्थानातील जैसलमेर ५० अंश तापमान असूनही भारतीय जवान कधीही मागे हटले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यास तसेच शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध
नैसर्गिक आव्हानांचा सामना करत देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांनी पीकांचे उत्पादन करण्यात कमतरता येऊ दिली नाही. देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता आपल्या जीवनातील शाश्वत सिद्धांत आहेत. या मार्गावर मार्गक्रमण करत सर्वांचे जीवन समृद्ध करण्याची आपली शिकवण आहे. नव्या पीढीवर काळानुरूप या सिद्धांताची सार्थकता स्थापन करण्याची जबाबदारी आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
महात्मा गांधींचे विचार अमलात आणणे गरजेचे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार अमलात आणणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केला. महात्मा गांधींचे जीवन आणि विचार यांचे चिंतन करणे आपल्या दिनचर्येचा एक भाग असायला हवा. समाजातील कोणतीही व्यक्ती दुःखी, कष्टी राहता कामा नये, यावर भर द्यायला हवा, असेही राष्ट्रपती म्हणाले.
इतिहासातील नायकांचे स्मरण
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या जननायकांच्या विचारांमुळे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाला कायम प्रेरणा दिली. मातृभूमिच्या सोनेरी भविष्यासाठी या प्रत्येकाच्या संकल्पना, विचार वेगळे होते. मात्र, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांनी त्यांचे स्वप्न एकाच सूत्रात बांधण्याचे काम केले, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.