नवी दिल्ली: आज ७४वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. संचलनाबरोबर येथे भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' याचे दर्शन होणार आहे.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य, तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना होणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते.
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल सिसी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील. अल सिसी यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तच्या लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे. इजिप्शियन लष्कराच्या १४४ सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणार आहे. इजिप्शियन आर्मीचा १२ सदस्यीय बँडही परेडमध्ये भाग घेणार आहे.
महिला जवानांचं उंटांच पथक-
यंदा प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर संचलनात नारी शक्तीचा सहभाग लक्षणीय आहे. विविध तुकड्यांचं नेतृत्व तर महिला अधिकारी करणारच आहेत. पण यंदाचं विशेष आकर्षण आहे ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महिला जवानांचं उंटांच पथक. ‘कॅमल राईडर्स बीएसएफ’ची ही तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत आहे. आपल्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर या महिला अधिकारी सीमा सुरक्षा दलाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. बीएसएफच्या वुमन कॅमल कॉन्टिजेन्टला राजस्थान फ्रंटियरच्या ट्रेनिंग सेंटर आणि बिकानेर सेक्टर यांनी प्रशिक्षण दिलं आहे. उंटावर स्वार असणारं हे जगातलं पहिलं महिला पथक आहे. हे महिला उंट पथक नुकतंच अमृतसर इथं झालेल्या बीएसएफ रेजिंग डे परेडमध्येही सहभागी झालं होतं.
हवाई दलाच्या गरुड कमांडोचा समावेश-
यंदा प्रथमच भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. गरुड कमांडो हे भारतीय वायुसेनेचे विशेष प्राणघातक दल आहे. ते जगातील सर्वोत्तम कमांडो दलांपैकी एक आहेत. त्यांचे प्रशिक्षण सर्वात मोठे असते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"