उत्तरकाशी : उत्तराखंड येथील सिलक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. आत्तापर्यंत बोगद्यात समोरून आडवे ड्रिलिंग करून डेब्रिज काढले जात होते. मात्र आता डोंगराच्या माथ्यावरून एक उभे छिद्र पाडून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. काम ठप्प पडल्याने मजूरांच्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.डोंगराच्या माथ्यावरून झाडे हटवली जात आहेत आणि तेथे ड्रिलिंग मशीन ठेवण्यात येत आहे.
समोरून ढिगाऱ्याला छिद्र पाडण्याचे तीन प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी झाले आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागू शकतात. १२ नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या पहाटे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात ढिगारा पडून कामगार अडकले आहेत.
आतापर्यंत काय झाले?बोगद्यात ४५ ते ६० मीटर मलबा साठलेला आहे. त्यात ड्रिलिंग करून पाइपांमधून कामगारांना बाहेर काढले जाणार आहे. कामाची गती मंदावलेली आहे. आत आणखी मलबा पडणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. इंदूरहून येणारे दुसरे मशीन ‘बॅकअप’च्या स्वरूपात वापरले जाईल.
ड्रिलिंग का थांबले?nड्रिलिंग सुरू असताना शुक्रवारी दुपारी जोरात आवाज झाला. आत काही तरी ढासळल्याचा हा आवाज असावा असा अंदाज आहे. त्यामुळे ड्रिलिंग थांबविण्यात आले.nतथापि, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ऑगर मशीन नादुरुस्त झाल्यामुळे ड्रिलिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळेच नवीन मशीन मागविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
आमचा धीर खचत चालला आहे...बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी त्यांच्या कुटुंबीयांचे शनिवारी बोलणे करून देण्यात आले. त्यांची शक्ती कमजोर होत चालली आहे, अशा शब्दांत कामगारांच्या नातेवाईकांनी आपली चिंता व्यक्त केली. आम्हाला प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. आता आमचा धीर खचत चालला आहे, असे हरिद्वार शर्मा यांनी सांगितले.
पाइपद्वारे संवाद अन्...nया बोगद्यात छत्तीसगढचे ५ कामगार अडकून पडले असून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही आमच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरकाशीला पाठविले आहे. nत्यातील एकाने अडकलेल्या कामगारांशी पाईपद्वारे संवाद साधला, असे छत्तीसगढ सरकारच्या श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.