देवभूमी मोठ्या संकटात; हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू, ९६० जणांची सुटका करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:49 AM2023-08-17T05:49:05+5:302023-08-17T05:49:34+5:30

शिमल्यात ढिगाऱ्यातून १४ मृतदेह काढले

rescue work started with the help of helicopter 960 people were rescued from uttarakhand | देवभूमी मोठ्या संकटात; हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू, ९६० जणांची सुटका करण्यात यश

देवभूमी मोठ्या संकटात; हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू, ९६० जणांची सुटका करण्यात यश

googlenewsNext

रुद्रप्रयाग :उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. तिथे अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम बुधवारी पुन्हा सुरू झाले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सकाळपासून आणखी ७० भाविकांना येथून बाहेर काढण्यात आले आहे.  उत्तराखंड, पंजाबमध्ये ९६० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मदमहेश्वरमधून आतापर्यंत १२२ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ११,४७३ फूट उंचीवर असलेल्या मदमहेश्वर पदपथावरील बणतोली येथील गौंडार पूल तुटल्याने तसेच तिथे जाणाऱ्या एका मार्गाचा एक भाग उद्ध्वस्त झाल्याने या ठिकाणी जवळपास २५० भाविक अडकले होते. उखीमठचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, एसडीआरएफच्या मदतीने मंगळवारी दिवसभर ऑपरेशन चालविण्यात आले आणि संध्याकाळपर्यंत ५२ यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले. 

नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आणि रस्त्याचा काही भाग कोसळल्याने भाविकांना वाचविण्याच्या अत्यंत आव्हानात्मक कामासाठी ‘रोप रिव्हर क्रॉसिंग पद्धत’ वापरली गेली. लोक पायी चालत हेलिपॅडवर पोहोचत आहेत आणि तेथून त्यांना हेलिकॉप्टरने रांसी गावात सोडले जात आहे.

मोठमोठे ढिगारे मंदिरावर पडले अन्...

- हिमाचल प्रदेशमध्ये शिमलाच्या समरहिल भागातून ढिगाऱ्याखाली दबलेले १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. शोधमोहीम अजूनही सुरू आहे. ढिगाऱ्यात आणखी अनेक मृतदेह दबले असण्याची शक्यता आहे. 

- २१ मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती आहे. या परिसरात एकाच कुटुंबातील सात जण बेपत्ता आहेत. हे लोक भूस्खलनाच्या वेळी शिवमंदिरात होते. याशिवाय रस्ता मार्गाने जाताना किती लोक भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले ते समजू शकलेले नाही. सोमवार असल्याने शिवमंदिरात भाविकांची ये-जा सुरू होती. मुसळधार पावसामुळे सकाळी ७:१५ च्या सुमारास मोठा आवाज होऊन झाडांसह मोठमोठे ढिगारे मंदिरावर पडले. मंदिराच्या आत असलेल्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

लोकांना मदत करताना त्याने जीव गमावला... 

‘मैं सलाउद्दीन बाबर खान, पेश हैं आज के मुख्य समाचार’... हे वाक्य आता हिमाचलमध्ये आकाशवाणी रेडिओवरून ऐकू येणार नाही. कारण, लोकांना मदत करत असताना यात सलाउद्दीन बाबर खान याचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या फागली येथे सोमवारी भूस्खलन झाले. यात बाबर खानचा भाऊ ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्याला वाचविण्यासाठी बाबर खान मदतीला धावला. यावेळी तो इतर लोकांनाही मदत करत होता. याचदरम्यान आणखी एक दरड कोसळली. यात बाबर खान दबला गेला.


 

Web Title: rescue work started with the help of helicopter 960 people were rescued from uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.