लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक नामांकनप्राप्त ‘केम्ब्रिज’ व ‘स्टॅनफोर्ड’ या विद्यापीठांत होणाऱ्या संशोधनाची बरोबरी भारतातील सगळ्या विद्यापीठांतील संशोधन एकत्र केले तरी होणार नाही. यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात देशातील शास्त्रीय संशोधनाचे भयाण चित्र समोर आले आहे. भारतातील ३९ विद्यापीठांच्या संशोधन कामगिरीचे मूल्यमापन शास्त्रज्ञांनी एकूण प्रकाशने, एकूण उतारे (सायटेशन्स) आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने झालेली एकूण प्रकाशने आदी वेगवेगळ्या निकषांवर केले. या निकषांची तुलना केम्ब्रिज (इंग्लंड) आणि स्टॅनफोर्ड (अमेरिका) या जागतिक पातळीवरील दोन क्रमांकाच्या विद्यापीठातील संशोधनाशी करण्यात आली. भारतात जागतिक दर्जाच्या दहा विद्यापीठांच्या स्थापनेचे प्रस्ताव आणि विधेयके तसेच शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय मानांकनासाठी प्रयत्न झाले आहेत, असे बनारस हिंदू विद्यापीठाचे विवेक कुमार सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. जागतिक दर्जाच्या विद्यापीठांसाठी महत्त्वाचे निकष असलेले संशोधन केंद्र सरकारकडून अनुदाने घेणाऱ्या विद्यापीठांत कसे चालते हे आम्हाला बघायचे होते, असेही सिंह म्हणाले. नव्या विद्यापीठांच्या तुलनेत जुने दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाची कामगिरी चांगली आहे. हैदराबाद विद्यापीठ हे तुलनेने लहान असले तरी त्याने संशोधनात प्रभावी कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले. भारतीय विद्यापीठांच्या सुमार कामगिरीसाठी जबाबदार असलेल्या कारणांपैकी संशोधनासाठी अयोग्य अशा पायाभूत सुविधा, अपुरा निधी, संशोधनासाठी कमी प्रोत्साहन ही काही आहेत. नोकरशाहीचे अडथळेदेशातल्या विद्यापीठांतील संशोधनाला एकत्र केले तरी ते केम्ब्रिज किंवा स्टॅनफोर्ड विद्यापीठांतील संशोधनापेक्षा कमीच आहे. या संशोधनासाठी मिळणाऱ्या निधीत नोकरशाहीचे अडथळे, विषयाचे अपात्र सदस्य, संशोधनासाठी अपुरे प्रोत्साहन, ही काही कारणे आहेत, असे विवेक कुमार सिंह म्हणाले. हा अभ्यास ‘करंट सायन्स’ पत्रिकेत प्रकाशित होईल.
भारतीय विद्यापीठांतील संशोधन खालावलेले
By admin | Published: May 29, 2017 1:13 AM