पुणे : देशाची भविष्यातील उर्जेची आणि साखरेची मागणी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणता येणार नाही. त्यासाठी साखरेची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र, सध्या साखर उद्योगातील संशोधन अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केले. मांजरी येथे व्हीएसआयच्या वतीने दुसरी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस आॅरिव्ह, पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मृद् व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जयप्रकाश दांडेगावकर, कल्लपा आवाडे या वेळी उपस्थित होते. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझिल, चीन, इजिप्त, फ्रान्स, इंडोनेशिया, आयर्लंड, जपान, फिलिपिन्स, स्पेन, श्रीलंका, थायलंड, दक्षिण अफ्रिका, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, सुदान अशा विविध २० देशातील ३४हून अधिक वक्ते सहभागी झाले आहेत. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यासाठी रासायनिक, सेंद्रीय आणि जैव खतांचा एकात्मिक वापरावर भर द्यायला हवा. या शिवाय दरवर्षी ३० टक्के बियाणे बदलत राहिले पाहिजे. जैव तंत्रज्ञान, नॅनॉ तंत्रज्ञान, मॉलेक्युलर तंत्रज्ञानाचा वापर करुन दुष्काळ, जमिनीतील क्षारता, रोगराईशी सामना करणाºया पिकांच्या जाती शोधाव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.
‘‘देशातील साखरेची मागणी २०२५ पर्यंत तीनशे ते ३३० लाख लाख टन असेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी साखरेची उत्पादकता वाढवायला हवी. सध्या दरहेक्टरी ७० टन असलेले उत्पादन अडीचशे टनांवर जायला हवे. सरासरी साखर उतारा साडेदहा टक्क्यांवरुन साडेअकरा ते बारा टक्क्यांदरम्यान असायला हवा. साखर संस्था, कारखाने आणि उत्पादकांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा. संशोधनातील गुंतवणूक वाढवायला हवी. तरच साखर उद्योग भविष्यातील साखर, इथेनॉल आणि उर्जेची मागणी देखील पुरवू शकेल.’’ -शरद पवार.............‘‘साखर उत्पादनामधे ब्राझिलपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. आता निर्यातीतही भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. थायलंड नंतर भारताचा निर्यातीत तिसरा क्रमांक येतो. मात्र, या पुढील काळात फुटबॉलमधेच नव्हे तर, साखरेतही भारत-ब्राझिल लढत पहायला मिळेल.’’ -डॉ. जोस आॅरिव्ह