प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:47 AM2021-08-14T06:47:48+5:302021-08-14T06:48:24+5:30
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी अमेरिका दौऱ्यावरून २१ ऑगस्टला परतल्यानंतर त्या पक्षामध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या किमान सात समर्थक आमदारांना राजस्थानच्या मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सोनिया गांधींनी सांगितले आहे. तसेच सचिन पायलट यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसमध्ये किंवा पक्षामध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी सोपविली जाईल अशी अटकळ आहे.
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून हरीश रावत यांचे नाव योग्यवेळी जाहीर केले जाईल. उत्तराखंडमध्ये काँग्रेस संघटनेत सोनिया गांधींनी याआधीच काही फेरबदल केले आहेत. गोवा येथील काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होत आहेत.
अहमद पटेल यांची जागा कोण घेणार?
सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेऊ शकेल अशा नेत्याच्या शोधात सध्या पक्षाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या खजिनदारपदी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची निवड केली आहे. काँग्रेसमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेले गुलाम नबी आझाद यांच्यावर आता जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली आहे.