कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयातील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर विविध मागण्यांसाठी पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांचे बेमुदत उपोषण रविवारी नवव्या दिवशीही सुरूच होते. कोलकाता आणि सिलिगुडी शहरांत बेमुदत उपोषण करणाऱ्या तीन कनिष्ठ डॉक्टरांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अखिल भारीतय वैद्यकीय संघटना महासंघाने देशव्यापी निवडक सेवाबंदीची हाक दिली आहे. यातून आपत्कालीन सेवा वगळण्यात आल्या आहेत, असे संघटनेने म्हटले आहे.
उपोषणार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्याच्या विविध भागांत लोक लाक्षणिक उपोषण करत आहेत, तर कल्याणी जेएनएम रुग्णालयातील ७७ पेक्षा जास्त डॉक्टरांनी या प्रकरणात सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.
काहीही झाले तरी लाक्षणिक उपाेषणाचा निर्धारआर. जी. कार रुग्णालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एक गट १२ तासांच्या लाक्षणिक उपोषणासाठी रुग्णालयात पोहोचला. तथापि, न्यायालयाच्या आदेशानंतर रुग्णालयात सुरक्षा कर्तव्यावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. काहीही झाले तरी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांतील नागरिक दिवसा लाक्षणिक उपोषण पाळत आहेत. दरम्यान, येथील कल्याणी जेएनएम रुग्णालयातील ७७ हून अधिक वरिष्ठ डॉक्टरांनी सामूहिक राजीनाम्यांची धमकी दिली आहे. पश्चिम बंगाल प्रदेश भाजपने रविवारी एक निवेदन जारी करून राज्यात सुरू असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
एकाला बेदम मारहाण, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागात रविवारी लोकांच्या एका गटाने हल्ला करून एका तरुणाला जखमी केले.
- आपल्या मित्रांसोबत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेलेल्या तरुणाला सुमारे १५ जणांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांची वाहने रुग्णालयाबाहेर उभी केली होती, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अशा अवस्थेसाठी राज्य सरकारच जबाबदार...डाॅ. अनुस्तूप मुखर्जी याच्या शाैचातून रक्त येत हाेते. पाेटात तीव्र वेदना हाेत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. अशा अवस्थेसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आराेप आंदाेलक डाॅक्टरांनी केला.