- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : नीट-पीजी समुपदेशनास दिरंगाई आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरुद्ध दिल्लीतील निवासी डॉक्टरांच्यासंपानंतर देशभरातील आरोग्य सेवा ठप्प होताना दिसत आहे. देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना आरोग्यसेवा पूर्णतः बंद ठेवणार असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील केईएम आणि सायन इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले की, ३० डिसेंबरपासून दुपारी २ वाजेनंतर बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आपत्कालीन आणि अतिदक्षता सेवा बंद केली जाईल. आसाम, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांतील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनीही संपात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारितील सफदरगंज इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. राजीव गांधी सुपरस्पेशालिटी इस्पितळाच्या निवासी डाॅक्टरांच्या संघटनेनेही आपली सेवा बंद केली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दिल्लीतील बव्हुंशी इस्पितळात अशीच स्थिती आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लागू करण्यात आलेल्या ‘यलो अलर्ट’चा हवाला देत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. फेडरेशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. मनीष यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी यलो अलर्टचा हवाला दिला आहे.