ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम यांची मुख्य भूमिका असलेल्या मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी मिळाल्याने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामाच दिला आहे. सरकारी हस्तक्षेप, दबाव आणि भ्रष्टाचार या कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे सॅमसन यांनी म्हटले आहे.
बाबा राम रहीम यांची प्रमुख भूमिका असलेल्या मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटात बाबा राम रहीम हे स्वतः देव बनले असून हा चित्रपट अंमलीपदार्थांच्या विरोधात संदेश देतो असे बाबा राम रहीम यांचे म्हणणे आहे. १६ जानेवारी रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपट गृहांमध्ये झळकणार होता. मात्र या चित्रपटावर शिख संघटनांनी बंदी घालण्याची मागणी केली आहे. बाबा राम रहीम यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले असून हा चित्रपट प्रदर्शित करुन अशा व्यक्तीला मोठ केलं जाऊ नये असे संघटनांचे म्हणणे होते. तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भिती गृहमंत्रालयाने वर्तवली होती. यापार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी टाकून हा चित्रपट एफसीएटीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या बंदीनंतरही एफसीएटीने परस्पर या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आणि चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला.
एफसीएटी ही समिती केंद्र सरकारच्या माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयांतर्गत येते. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी एफसीएटीच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाचे सर्व सदस्य आणि अध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून सरकारने अद्याप नवीन अध्यक्षांची नियुक्ती केलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली.