- एस. पी. सिन्हापाटणा - बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीशकुमार यांच्यासह नऊ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
रविवारी राजभवनाच्या राजेंद्र मंडपम येथे संध्याकाळी हा शपथविधी पार पडला. त्यात भाजपच्या कोट्यातून डॉ. प्रेमकुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विजेंद्र यादव, विजयकुमार चौधरी आणि श्रवणकुमार हे जदयूचे असून, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय ‘हम’ पक्षाचे संतोष सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीतून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्याला इतर मान्यवरांव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे, ‘हम’ पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी उपस्थित होते.
एनडीएचे सरकार स्थापन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाटणा येथील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. भाजप कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
- मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सकाळी ११ वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द केला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जदयू, भाजप आमदार आणि विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत नितीशकुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
- नितीशकुमार यांनी पुन्हा राजभवनात जाऊन राज्यपालांना १२८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत नवीन सरकार स्थापण्याचा दावा केला. नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी जदयूची बैठक घेतली. यामध्ये पक्षाच्या वतीने नितीशकुमार यांना कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.
जे सरकारमध्ये हाेते तेच श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत होते. आम्हाला त्यांच्यासोबत राहणे योग्य वाटत नव्हते. - नितीश कुमार
अजून खेळ संपलेला नाही. पुढे काय होईल ते पाहा. थकलेल्या मुख्यमंत्र्यांना ढकलत आम्ही काम केले. - तेजस्वी यादव, राजद
नितीश कुमार बाहेर जाणार हे माहित हाेते. ‘इंडिया’ अबाधित ठेवण्यासाठी काही बोललो नाही. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
पंतप्रधान मोदींकडून ‘गॅरंटी’ मिळाल्यावरच दिला राजीनामा!पाटणा : एनडीए आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करणारे नितीश कुमार पंतप्रधान मोदींनी फोन करून ‘गॅरंटी’ (हमी) देईपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास गेले नाहीत. सूत्रांनुसार रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींच्या फोननंतरच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सहकारी संजय झा आणि विजेंद्र यादव यांच्यासह राजभवनात जाऊन राजीनामा सादर केला.सूत्रांनुसार, नितीश यांना पंतप्रधान मोदींकडून आश्वासन हवे होते. मोदींचा फोन आल्यानंतर आपण भाजपसोबत गेलो, या समाधानासाठीही त्यांना मोदींचा फोन यावा अशी इच्छा होती. नितीश यांना जदयू नेत्यांना दाखवून द्यायचे होते की त्यांनी पंतप्रधान स्तरावर चर्चा केली, तेव्हाच त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचे मान्य केले. तसेच त्यांना भाजप नेत्यांना संदेश द्यायचा होता की, त्यांचा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी थेट संपर्क आहे.
एक फोन अन् सर्व काही बदललेगेल्या वेळी जेव्हा नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा भाजपचे अनेक नेते नितीशकुमार यांच्या विरोधात आवाज उठवत होते. भाजप नेत्यांकडून त्यांच्याच सरकारच्या प्रमुखाविरोधातील भाषणबाजी तीव्र झाली होती. यामुळे नितीशकुमार खूप दुखावले गेले आणि शेवटी त्यांनी आरजेडीसोबत जाण्याचा विचार केला. या वेळी भाजप हायकमांडने दिल्ली ते पाटण्यातील भाजप नेत्यांना नितीशकुमार आणि जदयूबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते उघडपणे बोलत नसल्याचे टीव्हीवरील वादविवाद आणि अन्य माध्यमांतून स्पष्टपणे दिसून येत होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी नितीशकुमार यांना फोन केला आणि त्यानंतर सर्व काही बदलले.