भोपाळ : कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तासंघर्षातून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा ट्विटरवर पोस्ट केला आहे. याच्या काही मिनिटांनंतरच काँग्रेसने खेळी खेळत सिंधियांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.
सिंधियांनी नुकतेच राजीनाम्याचे पत्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना ट्विटरवर पोस्ट केले. हे पत्र न स्वीकारताच काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी सिंधियांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधियांच्या हकालपट्टीवर मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार
सोमवारी सिंधिया यांच्या गटाचे 17 आमदार विमानाने बेंगळुरूला गेले आहेत. यामुळे मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार डळमळीत झाले होते. यातच कमलनाथ यांनी 26 पैकी 22 मंत्र्यांचे राजीनामे घेत नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करण्याची खेळी खेळली होती. सिंधिया यांच्या गोटामध्ये 6 मंत्री होते. मात्र, आज सिंधिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत त्यांनी थेट दिल्लीतील निवासस्थान गाठले. याचवेळी त्यांनी सोनिया गांधी यांना 9 मार्चच्या तारखेचे राजीनामा पत्र ट्विटरवर पोस्ट केले.
दरम्य़ान, सिंधियांच्या गटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामे पाठविले असून या आमदारांना बेंगळुरुतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.