हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर केला आहे. या अपक्ष आमदारांनी २२ मार्च रोजी राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांचे राजीमाने विधानसभा अध्यक्षांच्या टेबलावर होते. दरम्यान, आज त्यावर निर्णय घेत विधानसभा अध्यक्षांनी हे राजीनामे मंजूर केले आहेत. विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. आता या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी सांगितले की, तीन अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राजीनामा स्वीकारण्याची एक प्रक्रिया असते. तसेच याबाबत खटला हायकोर्टात सुरू होता, असे सांगितले. दरम्यान, या आमदारांच्या राजीनाम्यानंतर देहरा, नालागड आणि हमीरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर नालागड येथील अपक्ष आमदार के.एल. ठाकूर यांनी सांगितले की, केंद्रात भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर येत आहे. आता पोटनिवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी दिली, तर आम्ही अवश्य निवडणूक लढवणार आहोत. हमीरपूर सदर मतदारसंघातील आशिष शर्मा, नालागडमधी आमदार के.एल. ठाकूर आणि देहरा येथील होशियार सिंह यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांची पार्श्वभूमी भाजपाचीच होती. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता.