Jharkhand Politics ( Marathi News ) : ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काही वेळातच त्यांना अटकही करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत चंपई सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. तसंच चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत आपल्याकडे बहुमत असल्याचं सांगून सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही त्यांना राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरू होऊन काही आमदारांचे फोन बंद झाल्याची चर्चाही झारखंडच्या राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र आता अखेर राज्यपालांनी चंपई सोरेन यांना भेटीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
चंपई सोरेन यांना आज साडेपाच वाजता राज्यपालांनी भेटीला बोलावलं आहे. त्यामुळे आता चंपई सोरेन हे लवकरच झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
महाआघाडीचे आमदार हैदराबादला हलवण्याची चर्चा
राज्यपालांकडून भेटीसाठी केल्या जात असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आज झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी आणि काँग्रेस या महाआघाडीचे आमदार हैदराबादला हलवण्याची तयारी सुरू होती. विधीमंडळ नेते चंपई सोरेन आणि अन्य पाच आमदारांना राजकीय घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी रांचीत ठेवून इतर आमदारांना हैदराबादला हलवलं जाईल, असं बोललं जात होतं. मात्र आता राज्यपालांनी भेटीसाठी बोलावल्याने हा प्लॅन रद्द होण्याची शक्यता आहे.
सोरेन यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान
ईडीच्या कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तसंच आज या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र ही याचिका मागे घेत ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सोरेन यांच्या अटकेविरोधात कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आम्ही रांची हायकोर्टातील याचिका मागे घेतली असल्याचं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात कळवलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सोरेन यांना दिलासा मिळणार की ईडीकडून झालेल्या अटकेची कारवाई वैध ठरवली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.