पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत मिमी यांनी आपला राजीनामा पक्षाच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे दिला आहे.
मिमी चक्रवर्ती या २०१९ मध्ये जादवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मिमी यांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपविलेला नाहीय. यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे, असे समजले जाणार आहे. यामुळे ममता बॅनर्जी यावर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मिमी चक्रवर्ती हे बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. २०१२ मध्ये त्यांनी चॅम्पिअन सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी २५ हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांची लोकप्रियता पाहून टीएमसीने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते.