- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मुसेवाला यांची अंत्ययात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टर ५९११ मध्ये काढण्यात आली. अनेक पंजाबी गाण्यांमध्ये त्यांनी या ट्रॅक्टरचा उल्लेख केला होता. सिद्धू यांच्या आईने अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी मुलाच्या डोक्यावरून हात फिरविला आणि वडिलांनी सिद्धू यांच्या डोक्यावर मुंडावळी लावली तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. ११ जून रोजी मुसेवाला यांचा २९ वा वाढदिवस होता आणि जून महिन्यातच त्यांचा विवाह होता. अंतिम प्रवासाला निघालेल्या मुलाकडे आई- वडील डोळे भरून पाहत होते.
अंत्यसंस्कारानंतर मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरणकौर यांनी उपस्थित लोकांना हात जोडून त्यांचे आभार मानले. भावुक झालेल्या वडिलांनी डोक्यावरील पगडी काढून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित लोकांनी ‘पंजाब सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. मुसेवाला यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल लोकांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. मुसेवाला यांच्या शरीरावर गोळ्यांच्या २४ खुणा आढळून आल्या.
अर्ध्यावरती डाव मोडला...सिद्धू मुसेवाला हे सध्या लग्नाच्या तयारीत होते. जूनमध्ये लग्न होते. संगरुर जिल्ह्यातील संघरेडी गावातील अमनदीप कौर यांच्याशी त्यांचा विवाह होणार होता. सध्या त्या कॅनडात राहतात व तेथील स्थायी नागरिक आहेत. अमनदीप आणि सिद्धू मुसेवाला यांचा विवाह दोन वर्षांपूर्वीच ठरला होता. अमनदीप कौर या अकाली दलाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या भाची आहेत. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून विधानसभा निवडणूक लढविल्याने विवाह पुढे ढकलला.
मुसेवाला यांनी केला आत्मरक्षणाचा प्रयत्न
मुसेवाला यांनी हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांच्या जीपमधून एक पिस्तूल सापडले आहे. त्यातून काही राउंड फायर झाले आहेत. मुसेवाला यांनी आत्मरक्षणासाठी त्यातून गाेळ्या झाडल्या. हल्लेखाेरांनी सर्वप्रथम मुसेवाला यांच्या गाडीच्या टायरवर गाेळ्या झाडून ते पंक्चर केले हाेते.
चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुसेवाला यांच्या हत्येमुळे त्यांचे चाहते अतिशय व्यथित झाले आहेत. त्यातूनच माेहाली येथे एका १७ वर्षीय चाहत्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.