चंद्रपूर : चंद्रपुरातील जटपुरा गेटवरील वाहतुकीची कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना, केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिल्या. अंचलेश्वर मंदिरालगत बागेची उभारणी विरशाह या गोंडराजाच्या ऐतिहासिक समाधीचे जतन व परिसराचे सौंदर्यीयकरण, चंद्रपूरचे कारागृह परिसरात असलेल्या गोंडराजाच्या राजवाड्याला मुक्त करून या ऐतिहासिक वारस्याचे जतन करावे, या ठिकाणी दर्जेदार वास्तुसंग्रहालय निर्माण करण्यास प्रशासकीय स्तरावरुन होत असलेले प्रयत्न,े शहीद वीर बाबूराव शेडमाके यांना ब्रिटिशांनी ज्या पिंपळाच्या वृक्षावर फाशी दिली त्या परिसराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भात दिनांक २१ फेब्रुवारीला रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी मास्टरप्लान तयार करण्याचे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री यांनी दिले. त्याबाबतच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा १६ मे रोजी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेतला.सदर बैठकीस जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीस आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल सराफ, पुरातत्व खात्याच्या नागपूर विभागीय अधीक्षक नंदिनी भट्टाचार्य शाहू, महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज भुजबळ, पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळ व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. हंसराज अहीर यांनी उपरोक्त उल्लेखित बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आराखडा व सुधारित प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्याची सुचना केली. अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्षित भूमिका स्विकारल्याचे दिसते. परंतु हा प्रकार योग्य नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव जपण्याची जबाबदारी ही सामूहिक असली तरी प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असते, याकडेही त्यांनी या बैठकीतून लक्ष वेधले. त्यामुळे वरील बाबीचे प्रस्ताव त्याबाबतचा पाठपुरावा याबाबी प्रशासनाच्या माध्यमातूनच होणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.जटपुरा गेट वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने व या प्रश्नावर ओव्हरब्रिज, अंडरपास व अन्य पर्याय तपासण्यात आले. परंतु ते शक्य होत नसल्याने अंतिम पर्याय या लगतची खिडकी उघडणे असल्यास त्याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले असल्याने त्याबाबतची परवानगी व आवश्यक असलेली कार्यवाही प्रशासनाने पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीतील विविध विषयांवर ज्या चर्चा होतात त्या चर्चाच्या बाबतीत सकारात्मक कार्यवाही करून तसा अहवाल पुढील बैठकीत ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार पाडावी. केवळ वेळकाढूपणा व जुजबी माहिती सादर करण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी थांबविला पाहिजे असेही त्यांनी बैठकीत सूचित केले. जटपुरा गेट परिसराची पाहणी तात्काळ करण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. याबाबत पुढच्या बैठकीत अद्ययावत माहिती सादर झाली पाहिजे. या सर्व प्रस्तावावर सकारात्मक व प्रगतीच्या दिशेने कार्यवाही करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा असेही अहीर यांनी करताना सांगितले.(प्रतिनिधी)
चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवावा
By admin | Published: May 18, 2015 1:17 AM