नवी दिल्ली : कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांचे स्मरण करण्यात आले. दिल्लीतील अमर ज्योती जवान स्मारकावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सशस्त्र दलाच्या तीनही प्रमुखांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांच्या स्मृतीस मानवंदना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त १९९९ च्या कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या माझ्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे ते म्हणाले. या युद्धात भारतीय सशस्त्र दलाचे ४९० अधिकारी व जवान शहीद झाले होते.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. आपल्या देशाच्या इतिहासात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून नोंदवला गेला आहे. कारगिल युद्धात आपला एक एक जवान शंभर शंभर शत्रूंना भारी पडला. प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूला धूळ चारली. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या माझ्या देशाच्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले. कारगिल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर भारताच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात लढले गेले. प्रत्येक भारतीयाचे यात योगदान होते. शत्रूसोबत प्रत्यक्ष लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांनीही हे युद्ध लढले, असेही ते म्हणाले.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, हवाईदल प्रमुख मार्शल अरूप शहा आणि नौदल उपप्रमुख पी. मुरुगेसन यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योती या स्मृतिस्थळावर कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशबांधवांची शहिदांना आदरांजली
By admin | Published: July 26, 2015 11:37 PM