नवी दिल्ली : विशिष्ट धर्माविषयी काही लोकांनी केलेली वक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. सरकारची ती भूमिका नाही. भारतात सर्व धर्मांचा आदर केला जातो. त्यामुळे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) केलेली टीका संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवते, अशी खरमरीत प्रतिक्रिया केंद्र सरकारतर्फे सोमवारी देण्यात आली.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी विशिष्ट धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात ५७ सदस्यदेश असलेल्या ओआयसीने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी लक्ष ठेवावे, असे ओआयसीने म्हटले आहे.
त्यावर परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत सर्व धर्मांचा आदर करतो. काही व्यक्तींनी विशिष्ट धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यांशी केंद्र सरकारचा संबंध नाही हे ओआयसीने लक्षात घ्यावे. मात्र, या गोष्टीचा विचार न करता ओआयसीने भारतावर हेतुपुरस्सर दिशाभूल करणारी टीका केली आहे.