नवी दिल्ली : वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशात पहिल्यांदाच दिल्ली सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी लागू केलेल्या महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवरील कारच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. हजारो पोलिसांची तैनाती आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवत सार्वजनिक वाहनांच्या संख्येत केलेली वाढ हाही महत्त्वपूर्ण बदल दिसून आला. वाहनांची संख्या सीमित करण्याची योजना स. ८ वाजतापासून अमलात आली. हजारो स्वयंसेवक पोलिसांना मदत करताना दिसून आले. ही योजना १५ जानेवारीपर्यंत लागू राहील. शुक्रवारी विषम क्रमांकांची वाहने धावताना दिसत होती. शुक्रवारी ८ वाजता ही योजना लागू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच(३३ मिनिटे) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयटीआय जंक्शन येथे एका कारचालकाला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यासह खटला दाखल करण्यात आला. ग्रेटर नोएडा- नोएडादरम्यान जोडल्या जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पारी चौकापासून जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्यामुळे मला सम क्रमांक असलेली कार घेऊन जाण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता, असा कारचालकाचा युक्तिवाद होता.गांधीगिरीमुळे रंगत...नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी २०० ठिकाणी गांधीगिरी करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गुलाबांची फुले भेट दिल्यामुळे वाहनचालकांची करमणूक झाली. दिल्ली सरकारने सुमारे १० हजार स्वयंसेवक लोकांना विनंती करण्यासाठी कामी लावले होते. मंत्र्यांनी केली बाईकस्वारी...दिल्लीच्या मंत्र्यांनी मोटरबाईक, ई-रिक्षा, बस आणि भाड्याच्या कारसारख्या विविध वाहनांचा वापर करीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालय गाठले. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा हे सकाळी ९ वाजतादरम्यान बाईकने सचिवालयात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रवाशी खुश... स्वागत अन् विरोधहीकाहींनी दिल्ली सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे स्वागत केले तर काहींनी ही योजना प्रत्यक्षात आणणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले. रस्त्यांवर वाहनाची गर्दी नसल्यामुळे प्रवासी खूष दिसून आल्याचे एका टॅक्सी चालकाने सांगितले. माझ्याकडे दोन्ही कार विषम क्रमांकाच्या असल्यामुळे मला आठवड्यातून निम्मे दिवस काम करता येईल अथवा कॅबचा वापर करावा लागेल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना या योजनेत मुभा द्यायला हवी, असे एका डॉक्टरांनी म्हटले.‘सेव्ह दिल्ली सेव्ह इंडिया’.... : या योजनेच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘सेव्ह दिल्ली, सेव्ह इंडिया’ हा नारा देत नॉर्थ कॅम्पसपर्यंत काढलेली सायकल रॅली लक्षवेधी ठरली.भाजपच्या खासदाराची कार रोखलीभाजपचे बागपत येथील खासदार सत्यपाल सिंग यांची सम क्रमांक असलेली पांढऱ्या रंगाची एसयुव्ही कार रोखण्यात आली. इंडिया गेटजवळ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची कार थांबविली तेव्हा खा. सत्यपालसिंग मागच्या आसनावर बसलेले होते. सत्यपालसिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त राहिले आहेत. त्यांना दंड ठोठावला की नाही हे लगेच कळू शकले नाही.आम आदमी पार्टीच्या सरकारने घेतलेल्या प्रायोगिक पुढाकाराला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.प्रारंभीच्या वृत्तानुसार आमची योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. ही योजना लोक स्वत:हून स्वीकारतील तरच यश मिळेल. दिल्ली हे शहर उर्वरित देशाला मार्ग दाखवेल.- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री.जनतेने स्वत:चे मिशन म्हणून ही योजना स्वीकारली आहे. सरकार केवळ त्यांना मदत करीत आहे, म्हणूनच ही आदर्श व्यवस्था निर्माण झाली आहे.-मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री.
सम-विषम योजनेला दिल्लीमध्ये प्रतिसाद !
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM