ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 29 - देशातील दिव्यांग व्यक्तीं या सर्व देशाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी नवीन शोध घेऊन अधिकाधिक सुविधा देणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. गुजरात दौऱ्यावर असलेल्या मोदींनी राजकोट येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्याच आलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. त्यावेळी त्यांनी दिव्यांग हे केवळ त्यांच्या कुटुंबाचीच जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
दिव्यांगांबाबत पंतप्रधान म्हणाले, मी जेव्हा दिल्लीचे नेतृत्व सांभाळले तेव्हा केवळ दिव्यांग हा शब्दच शोधून काढला नाही तर अशा व्यक्तींना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्याला एवढी वर्षे लोटूनही महा देशात एक गोष्ट जाणवली ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यात दिव्यांगांसाठी वेगवेगळी चिन्हे होती. त्यामुळे गुजरातचा दिव्यांग तामिळनाडूमधील दिव्यांगाशी संवाद साधू शकत नसे. मात्र आम्ही सत्तेत आल्यावर यात बदल केला. आम्ही अशी व्यवस्था बनवली ज्यामुळे देशातील कुठल्याही भागातील दिव्यांग अन्य भागातील दिव्यांगांश संवाद साधू शकतील."
यावेळी मोदींनी आपल्या राजकोटशी असलेल्या विशेष नात्याचाही उल्लेख केला. " माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात राजकोटमधूनच झाली होती. त्यामुळे राजकोटला माझ्या हृदयात खास स्थान आहे. जर राजकोटने निवडून मला गांधीनगरला पोहोचवले नसते तर मी कधीच दिल्लीला पोहोचू शकलो नसतो," असे मोदी म्हणाले.