आपल्याकडे रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणानंतर माऊथ फ्रेशनर दिले जाते. पण, ते खरच माऊथ फ्रेशनर आहे का हे तापसून घेतले पाहिजे. माऊथ फ्रेशनर खाऊन अचानक तोंडातून रक्त येऊ लागेल, हरियाणातील गुरुग्राममध्ये एक अशी घटना समोर आली आहे. माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर ५ जणांची प्रकृती बिघडली. यामुळे या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंट विरोधात आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता अंकित कुमार त्याच्या पत्नी आणि मित्रांसह गुरुग्रामच्या खेरकिदौला सेक्टर ९० मधील लाफोरेस्टा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्रीच्या जेवणानंतर त्यांना माउथ फ्रेशनर देण्यात आले. ते खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाचही लोक काहीतरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालेले दिसत आहेत. काहीतरी खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडून रक्त येत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
या हॉटेलमध्ये जेवायला आलेल्यांमधील एक व्यक्ती म्हणजेच अंकित यातून बचावले आहेत. अंकित यांनी आपल्या मुलीला आपल्या जवळ घेतले होते, त्यामुळे ते माऊथ फ्रेशनर खाऊ शकले नाहीत. ग्रुपमधील ते एकटेच होते ज्यांना काहीही झाले नव्हते.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अंकित कुमार यांनी माऊथ फ्रेशनरचा नमुनाही स्वत:जवळ ठेवला. ते नंतर डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, पाच जणांनी जी वस्तू खाल्ली ती वस्तु ड्राय आईस होता. यात कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. हे कूलिंगसाठी वापरले जाते.