नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीति आयोगाची पुनर्स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पंतप्रधान हेच निती आयोगाचे अध्यक्ष राहणार असून डॉ. राजीव कुमार हे पुन्हा एकदा उपाध्यक्षपदी दिसणार आहेत. तर अमित शहांना नीति आयोगाच्या सदस्यपदी संधी देण्यात येणार असल्याचे समजते.
नीति आयोगाच्या पदधारी सदस्यांमध्ये गृहमंत्री अमित शहांसह संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सितारमण, शेती आणि ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचाही समावेश असणार आहे. तसेच दळणवळणमंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद्र गहलोत, रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री इंद्रजीत सिंह हे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत. तर, व्ही.के. सारस्वत, प्राध्यापक रमेश चंद्र आणि डॉ. व्ही.के. पॉल हे दुसऱ्यांदा निती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य असणार आहेत.
नीति आयोगाची प्रशासकीय बैठक 15 जून रोजी निर्धारीत करण्यात आली आहे. याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीयमंत्री आणि अधिकाऱ्यांचीही बैठक होईल. या बैठकीत, शेती, पाणी आणि सुरक्षा यांसदर्भातील महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहेत.