ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 24 - ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम सेन्सेक्सवर झाला आहे. बाजार उघडण्यापुर्वीच म्हणजे प्री ओपनिंगलाच सेन्सेक्स 900 अंकांनी गडगडला आहे. मात्र बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स किंचित सुधारला आहे. निफ्टीमध्येही 286 अंकांची घसरण झाली आहे. निकाल येण्याअगोदर बाजार कोलमडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र निकाल आल्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होईल. दरम्यान रुपया देखील घसरला असून डॉलरच्या तुलनेत 89 पैशांनी घसरण होऊन 68.17 वर पोहोचला आहे. ब्रेक्झिट मतदानाचा परिणाम पाऊंडवर देखील झाला असून 31 वर्षातील निच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला आहे.
ब्रेक्झिटचा भारतावर काय परिणाम होईल?
ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला, तर त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवरही होईल. 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन युनियन ही भारसाठी सर्वातमोठी बाजारपेठ आहे.
जवळपास 800हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची सहा ते अठरा टक्के कमाई ब्रिटनमधून होते. बहुतेक भारतीय कंपन्यांसीठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
आता ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
ब्रेक्झिटमुळं युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल.
जगभरातील शेअर बाजारांवरही ब्रेक्झिटमुळं परिणाम झालेला दिसू शकतो.