ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - पुद्दुचेरीतील विजय वगळता आसाम व केरळ या राज्यातील सत्ता गमावणे आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूतही मतदारांनी दूर लोटल्याने काँग्रेस उतरणीचा काळ सूर झाल्याची चर्चा सुरू आहे. या पराभवानंतर विरोधकांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलेला असतानाच आता स्वपक्षीयांनीही याप्रकरणी आपली मते स्पष्ट मते मांडण्यास सुरूवात केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही 'पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकाल निराशाजनक असला तरी अनपेक्षित नक्कीच नव्हता' असे म्हणत नाराजी दर्शवली आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून आपली मते स्पष्टपणे मांडत पक्षाने पराभवापासून धडा घेऊन ठोस कृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
' आजचे (आसाम व केरळमधील) निकाल हे निराशाजनक असले तरी अनपेक्षित नव्हते. आपण बराच काळ पराभवाचे परीक्षण केले आहे, आता (पक्षाने) ठोस कारवाई करण्याची गरज आहे' असे ट्विट त्यांनी केले आहे. आम्ही सर्वजण आता कृतीची वाट पाहात आहोत, असेही त्यांनी म्हटले.
Today's results disappointing but not unexpected. We have done enough Introspection shouldn't we go for a Major Surgery ?— digvijaya singh (@digvijaya_28) May 19, 2016
कालच्या निकालानंतर काँग्रेसने आसाम व केरळमधील सत्ताही गमावली असून सध्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, पुद्दूचेरी, मेघालय, मिझोराम आणि मणिपूर या फक्त सात राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकापासून सुरू झालेली काँग्रेसची घसरगुंडी कायम असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल.