नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेशासाठी दिलेली अनुमती यासंदर्भातील निकालांच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या, गुरुवारी निर्णय देणार आहे. त्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ शबरीमाला निकाल फेरविचारप्रकरणी आपला निर्णय देईल. या खंडपीठात न्या. रोहिंटन फली नरिमन, न्या. अजय खानवीलकर, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे.सरन्यायाधीशांसह तीन न्यायाधीशांचा समावेश असलेले खंडपीठ राफेलप्रकरणी निकाल जाहीर करणार आहे. या खंडपीठात न्या. संजय किशन कौल, न्या. के.एम. जोसेफ यांचाही समावेश आहे. शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी रद्द केली होती. याप्रकरणीचा निकाल न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात राखून ठेवला होता. या मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय उद्या कायम ठेवेल किंवा तो निर्णय बाजूला ठेवला जाईल. त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे.
लोकसभा प्रचारात उठविले रान३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळून लावली होती. या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशा केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या, गुरुवारी निकाल जाहीर करील.याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता. राफेल खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केला होता. त्यावरून त्यांनी रान उठविले होते.